अंताजी मानकेश्वर गंधे
अंताजी माणकेश्वर गंधे

केतकर ज्ञानकोशातुन मिळणारी माहिती 

     उत्तर हिंदुस्थानांतील पेशव्यांचा एक सरदार ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. आडनांव गंधे. नगरजिल्ह्यांतील कामरगांवचा जोशीकुळकर्णीं. जावळी प्रकर्णांतील राघोबल्लाळ अत्रे याचा नातु त्रिंबकपंत अत्रे हा अंताजीपंताचा मावसभाऊ असल्यानें त्याच्या आश्रयास अंताजी कर्‍हेपठारप्रांतीं आला. त्रिंबकपंत वारल्यावर त्याच्या मुलांचा प्रतिपाळ व वतनीगांवचा कारभार अंताजी व त्याचा वडील भाऊ हरि हे करूं लागले. अंताजी हा शाहूच्या पदरीं प्रथम उदयास आला. नंतर तिकडून पेशव्यांकडे बदलला. यानंतर १७५३ पर्यंतची त्याची हकीकत समजत नाहीं. त्यावेळीं त्यानें दिल्लीस बादशहास मदत केली. तिच्या बद्दल त्याल इटावा व फुफुंद हे दोन परगणे जहागीर मिळाले.

  अंताजी पेशव्यांच्या तर्फे दिल्लींत फौज घेऊन होता, त्याचें व वकील हिंगणे यांचें पटत नव्हतें. त्याचें बीज असें कीं, अंताजी थोडासा स्वत:ची प्रौढी मिरविणारा असून तो परभारें वजिराशीं वगैरे उलाढाली करूं लागला. हा प्रकार हिंगण्यास सहन झाला नाहीं. इ. स. १७५२-५३ त शिंदे होळकर दक्षिणेंत असल्यामुळें एकटा अंताजी पेशव्यांची पांच हजार फौज घेऊन पातशहाच्या संरक्षणासाठीं दिल्लीस होता. अंताजीनें फौज वाढविली तिला आगाऊ परवानगी घेतलेली नव्हती आणि तिच्या खर्चास पैसा नसून तारांबळ उडाली होतीं. पेशव्यानें अंताजीचा बंदोबस्त २०।१०।१७५३ रोजीं करून दिलां (ना. रो ६९) अंताजी माणकेश्वराच्या कामगिरीचे उल्लेख (रा. खं. ६, १४९. १८९. २०१) वगैरे ध्यानांत ठेवण्याजोगे आहे.

   हिंगण्याबरोबरील तंट्यास मूळ कारण अंताजी माणकेश्वर असून, पैशावरून अंताजीशीं हिंगण्यांचा तंटा इ. स. १७५० पासूनच वाढत गेला (६.४७९). कुंभेरीहून दिल्लीवर चाल करण्याच्या प्रसंगी हा तंटा कळसास पोंचला होता. दामोधर महादेव पेशव्यास लिहितो, 'पातशाही तोफखाना (कुंभेरीवर) आणावयाची आज्ञा श्रीमंतीं केली. त्यास येथून तेथें 'लिहावें, अर्ज करावा, तो वकील पदरचा करितात ऐसें अंताजींना सांगावें तेणेंकरून काम होणेस दिरंगाई पडावी. अंताजीपंताचे सांगितल्यावरी हा मजकूर व्हावासा नाहीं. परंतु अंताजीपंत सखारामपंत व्याही; सखारामपंत श्रीमंतांचें दिवाण, श्रीमंत बज्यास्वामीच ! असा प्रकार तेथें दर्शवून अंताजीपंत बोलतील तें आमचें बोलणें समजावें ऐसें सखारामपंतीं त्यांचें निदर्शनास आणून दिल्हें. याजकरितां आतां आम्हांस आज्ञा न करावी. ''सखारामबापू व अंताजीपंत व्याही आणि रघुनाथराव भोळा व सखारामबापूच्या मुठींत, हा प्रकार पुष्कळांस जाचक झाला.

   इ. स. १७५५ च्या एप्रिलांत रघुनाथराव हिंदुस्थानांत असतां पेशवा व अंताजी माणकेश्वर यांची भेट नाशिक येथें झाली. त्यावेळीं अंताजीस पेशव्यानें हिंदुस्थानांत रवाना केलें आणि रघुनाथराव सांगेल ती कामगिरी करण्याचा हूकूम केला. त्याप्रमाणें अंताजी तिकडे जात असतां फौज न ठेवतां खोटी गणती दाखवून अंताजी पैसे उपटतो असा संशय येऊन रस्त्यांत पेशव्याचे हुकमानें दोन वेळां फौजेची झडती मुद्दाम खात्रीच्या माणसांकडून करण्यांत आली. ती कमी न भरतां बरोबर सात हजार भरली असें अंताजी लिहितो. रघुनाथराव परत येत असतां माळव्यांत अंताजीची व त्याची भेट झाली. रघुनाथरावानें अंताजीस अंतर्वेदींत गोपाळराव गणेशाच्या मदतीस जाण्याचा हूकूम केला. शिंदे वर्षभर मारवाडांत पेंचांत सांपडले असतां, त्याच्या मदतीस अंताजीस न पाठवितां, आपल्या मेव्हण्याकडे जाण्याचा हूकूम केला. यावरून शिंद्यांचें व रघुनाथरावाचें बरेंच बिनसलें होतें असें दिसतें. जुलै आगस्टांत अंताजीचा मुक्काम काल्पीजवळ यमुनातीरीं होता. त्यापूर्वीच जून महिन्यांत जयाप्पाचा खून झाला होता. सप्टेंबरांत दत्ताजी व जनकोजी यांस पेशव्यांची पत्रें पोंचल्यावर; त्यांनीं अंताजीस पत्र पाठवून मारवाडांत आपल्या मदतीस बोलाविलें. पेशव्यासहि तसें कळविल्याबद्दल त्यांनीं अंताजीस लिहिलें. या पत्रांत मारवाड स्वारीचा साद्यन्त वृत्तान्त शिंद्यांनीं अंताजीस कळविला. तेव्हां रघुनाथरावाचा हूकूम मानावा कीं, शिंद्याचें ऐकावें, असें द्विधाचित अंताजीचें झालें. इतक्यांत मारवाडांत जाण्याविषयीं पेशव्याचा निकडीचा हूकूम अंताजीस आला. 'मातबर सरंजामानिशीं मारवाडांत जाऊन, साम, दाम, दंड, भेद युक्तीस पडेल तसें करून, शिंदे यास काढून घेऊन येणें' तेव्हां गोविंदपंत बुंदेल्याकडून वीस लाख कर्ज घेऊन विजयादशीमीच्या मुहूर्तानें (१४-१०-१७५५) अंताजी फौजेची जमवाजमव करीत मारवाडांत गेला. रस्त्यांत करवली व बुंदीकोटा येथील फौजा राठोडांच्या मदतीस येत होत्या. त्यास पैका भरून अंताजीनें मागें वळविलें. जयनगरचा माधोसिंग, बिजेसिंगाचें साह्य हरप्रकारें करीत होता. सबब अंताजीनें जयपूरचा मुलुख लुटून त्यास तंबी पोंचविली. जयपूरचा अनिरुद्धसिंग याची व शिंद्याच्या फौजेची लढाई होत होती त्यांत ऐन वेळीं अंताजीची मदत आल्यामुळें शिंद्याच्या फौजेस मोठा धीर आला. मोठया शिकस्तीनें लढाई करून, अनिरुद्धसिंगास मराठ्यांनीं अडविलें; तेव्हां माधोसिंगानें घाबरून त्यास परत बोलाविलें. आणि अनिरुद्धसिंग अंताजीच्या छावणींत तहासाठीं गेला. नंतर जयपूरची फौज परत पाठवून अंताजी व अनिरुद्धसिंग शिंद्याच्या भेटीस आले. शेवटी झाल्यावर सर्व फौजांनीं नागोरावर मारा सुरू करतांच बिजेसिंग मोठ्या हिंमतीनें पुन: चालून गेला. त्यांत त्याचा पूर्ण पराभव होऊन त्यानें तहाची बोली लाविली परंतु बिजेसिंगास काढून रामसिंगास संपूर्ण राज्य दिल्याशिवाय दत्ताजी तह करीना. त्याबरोबर, जरब बसून बिजेसिंग मराठे सांगतील त्याप्रमाणें तह करण्यास कबूल झाला. अंताजीपंताच्या मार्फत तह ठरला. फार ओढून धरूं नये असें अंताजीनें दत्ताजीस सुचविलें.

  हिंगण्याचा बंदोबस्त राघोबानें केला, तसा अंताजी माणकेश्वराचा इ. स. १७५८ त केला. पुढें अंताजीस पकडून दक्षिणेंत पाठविलें कीं काय तें समजत नाहीं. इ. स. १७५९ च्या अखेरीस तो पुण्यांत असून सदाशिवराव त्याचे हिशेब तपासीत होता (३.२३३). मेरट वगैरे महाल अंताजीकडे होते. ते दूर करून सात लक्ष रुपये सरकारांत देण्याच्या करारावर डिसेंबर १७५८ त ते बापूजी महादेवाकडे देण्यांत आले (६.४७१). एकंदरींत अव्यवस्थेची कमाल झाली होती, ती सर्व सदाशिवरावानें तोडिली. त्यानें हिंगणे व अंताजी माणकेश्वर यांच्या प्रकरणांचा तपास करून निकाल लावून दिला (३.२३३) आणि लगेच पुढें स. १७६० च्या आरंभीं अंताजीपंत आपल्या कामावर रुजू झाला. सदाशिवराव दिल्लीस असतां हे सर्व सरदार रेशमासारखे मऊ येऊन त्याच्या केवळ भजनीं होते.

. पनिपताच्या लढाईनंतर अंताजी माणकेश्वर, बाजी हरि, नाना पुरंदरे व मल्हारराव होळकर असे रात्रौ दिल्लीचे सुमारें चालले असतां दांडग्यांच्या हुल्लडींत फरुखाबादच्या जमीनदाराच्या हातून अंताजी माणकेश्वर व बाजी हरि ठार झाले.

   अंताजीच्या मुलाचे नांव बहिरोपंत. अंताजीपंताचे वंशज हल्लीं उत्तरहिंदुस्थानांत भेलशें येथें रहात आहेत. त्यांनीं आपलें आडनांव 'मांडके' असें लाविलें आहे (भा. इ. सं. मं त्रैमासिक वर्ष ३ अंक २-३-४)  

माहिती स्रोत : - केतकर ज्ञानकोश 

निशांत कापसे 
  

Comments

Popular Posts