कुंभेरीचा वेढा

कुंभेरीचा वेढा

रघुनाथराव उर्फ दादासाहेबांची पहिली मोहीम....

कुंभेरीचा वेढा  ( १७५३-५४ ) 

       १८ व्या शतकात हिंदूस्तानात अनेक सत्तांचा उदय झाला. त्यात प्रमुख होते ते  मराठे , जाट आणि रोहिले. 
दुआबात म्हणजेच अंतरर्वेदात रोहिल्यांचा मुलुख होता. तर चमेलीच्या पलिकडचा मुलुख हा जाटांचा होता.    इ. स. १७५२ मध्ये बादशाह व पेशव्यातर्फे शिंदे - होळकरांत घडून आलेल्या तहानुसार पेशव्याला तुर्की बादशाहकडून अजमेर व आग्रा या दोन सुभ्यांची सुभेदारी प्राप्त झाली होती. पेशव्याने आपल्यावतीने शिंद्यास अजमेर तर होळकरास आग्रा देऊ केले. पैकी शिंद्यास मिळालेल्या अजमेरात मारवाडकर बिजेसिंग ठाण मांडून बसला होता तर आग्ऱ्यास जाट प्रबळ होता. अशा स्थितीत हे दोन सुभे आपल्या ताब्यात घेण्यासाठी पेशव्याने रघुनाथरावासह शिंदे - होळकरांना हिंदुस्थान प्रांती रवाना केलं व त्यातून कुंभेरीची मोहीम उद्भवली अशी एक सामान्यतः मांडणी आजवर मराठी इतिहासकारांनी केली आहे, करत आहेत. 
कुंभेरी ही दादासाहेब म्हणजेच रघुनाथरावांची पहिली मोहीम समजली जाते. 

शिंदे - होळकरांमध्ये वितुष्ट , दादासाहेबांची सुरजमल जाटांच्या कुंभेरीवर स्वारी. 

     १७४३ पासून म्हणजे महाराजा सवाई जयसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये गादीसाठी संघर्ष निर्माण झाला. आणि त्याच बरोबर शिंदे व होळकर यांच्यात वितुष्टाला सुरुवात झाली. 
पुढे १७४७ मध्ये इराणच्या नादिरशहाचा मृत्यू झाला. पुढचे नेतृत्व हे अहमदशहा अब्दालीकडे आले. 
१७५२ साली भारतात आला तेव्हा दिल्लीच्या बादशहाने आपला वजीर सफदरजंगास याच्या वतीने मराठ्यांशी करार केला. हा करार अहमदिया करार म्हणून ओळखला जातो. हा करार मराठ्यांच्या वतीने शिंदे व होळकर यांनी केला. या करारानुसार मराठे आपली काही फौज आपल्या एका सेनापतीसह दिल्ली दरबारात ठेवतील. व बादशाहीचे परकीय आक्रमणांपासुन रक्षण करतील. व त्या बदल्यात अजमेर व आग्रा इ. प्रदेशातून मराठ्यांना चौथ वसुलीचे अधिकार मिळतील. या करारानुसार अंताजी मानकेश्वर गंधे यांना दिल्लीतील मराठ्यांचे सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले. 
अजमेर हे बिजेसिंगाचे तर आग्रा हे सुरजमल जाटांचे होते. जाटांनी या बद्दल नाराजी दर्शविली. 
रघुनाथरावास पेशव्याचे कर्ज फेडण्याकरता तसेच सैन्याचा खर्च भागवण्यासाठी पैशांची निकड असल्याने त्याने हि मोहीम स्वीकारली. शिवाय इमादउल्मुक उर्फ धाकटा गाजीउद्दीन हा दख्खनमधील हैद्राबादच्या निजामाचा वंशज असल्याने दक्षिणेत पेशव्याला नडणाऱ्या निजामबंधूंवर दाब ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होणार होता. सारांश, बादशाही मदतीच्या नावाखाली इमाद आणि रघुनाथरावाने संगनमताने हे कुंभेरीचे राजकारण शिजवले.

    याला आणखीही काही बाजू आहेत. स. १७५२ मध्ये तत्कालीन वजीर व अयोध्येचा नवाब सफदरजंग याच्या विद्यमाने दिल्लीचा तुर्की बादशहा व पेशव्यातर्फे शिंदे - होळकरांच्या दरम्यान एक तह घडून आला, ज्यानुसार तुर्की बादशाहीचे अंतर्बाह्य शत्रूंपासून रक्षण करण्याचे मराठी सरदारांनी मान्य केले. याबदल्यात पेशव्याला अजमेर आणि आग्रा सुभ्याची सुभेदारी प्राप्त झाली. पैकी, पेशव्याने आग्रा होळकरास तर अजमेर शिंद्याला देऊन टाकले. आता आग्र्याच्या सुभ्यातच जाटांचे बलवान राज्य उदयास आल्याने होळकरास, पर्यायाने पेशव्याला त्याच्यावर शस्त्र उचलणे भाग होते.

   आता या राजकारणाची तिसरी बाजू म्हणजे बादशहा अहमदशाह व त्याचा विद्यमान वजीर इंतिजामउद्दौला. पैकी, इंतिजाम हा मीरबक्षी इमादचा नातलग -- चुलत चुलता असून त्याचे आणि इमादचे आपसांत काहीतरी कारणावरून वैमनस्य होते आणि या दोन वजनदार उमरावांतील वैरामुळेच पुढील राजकारणास निराळे वळण लाभत गेले.

    इंतिजामउद्दौलाचे बादशाहवर विशेष वजन असून स्वतः बादशाह आपल्या अधिकारांच्या बाबतीत जागरूक असला तरी निर्णयक्षमतेच्या बाबतीत तो दुर्बल होता. त्यामुळे दिल्ली दरबारातील राजकारणाची दिशा उमरावांच्या चलतीनुसार बदलत जाऊन त्यास स्थिरता कधीच आली नाही.
    इंतिजामउद्दौला आपल्या वडिलांचे, माजी वजीर कमरुद्दीनखानाचे धोरण -- मराठी सैन्याला नर्मदेपार  हाकलून लावण्याचे, कधीच विसरला नाही. त्यामुळे सफदरजंगच्या पश्चात त्याच्याकडे वजिरी येताच त्याने हिंदुस्थानातील सत्ताधीशांचा एक संघ उभारून त्यांच्याद्वारे मराठी सरदारांना नर्मदापार हाकलण्याची योजना बनवली. त्याच्या या योजनेत राजपूत राजांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून जाट राजा सुरजमल तसेच माजी वजीर सफदरजंगही त्यात सामील होते. या राजकारणापैकी आपणांस कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराच्या मृत्यूपर्यंतचाच भाग बघायचा आहे.


 सुरजमल जाटांचे दादांना उत्तर :-
इ.स. १७५३ च्या सप्टेंबर अखेर रघुनाथरावाच्या नेतृत्वाखाली मराठी फौजा नर्मदापार झाल्या. रघुनाथरावाची हि पहिली हिंदुस्थान स्वारी असून कागदोपत्री हिचे प्रयोजन दिल्लीत सुरु असलेल्या सफदर - बादशाह झगड्यात बादशाहची बाजू घेण्याचे असले तरी पेशव्याने आपल्या भावास या संघर्षातून अलिप्त राहण्याचा कानमंत्र दिल्याचे पुढील घटनाक्रमावरून दिसून येते.
सुरजमल जाट यांनी आपला वकील रुपराम कटारी यांना दादासाहेबांच्या भेटीस पाठवले. दादासाहेबांनी त्यांच्याकडे एक कोटी रुपये खंडणी मागितली. जाट ४० लाख रुपये देण्यास तयार होते. 
रुपराम कटारी यांनी कळविले " पेशवे एकत नाही. एक कोट रुपये मागतात " सुरजमल जाटांनी दादासाहेबांना लिहिले " चाळीस लाख रुपये देतो , ते घ्यावे किंवा युद्धास  उभे रहावे " म्हणून पाच गोळ्या व दारु पाठवली. 
कुंभेरी हे ठिकाण भरतपूच्या वायव्येस चार कोसांवर आहे. कुंभेरीची मोर्चेबांधणी व खंडेरावांचा मृत्यू 
     दि. २० जानेवारी १७५४ रोजी दादांनी मोर्चेबांधणी केली. बंदुकांचे व तोफांचे बार होऊ लागले . या सर्वात १५ दिवस गेले. 
कुंभेरीचा किल्ला अत्यंत मजबूत होता. भाऊसाहेबांच्या बखरीतील एक नोंद आहे ती अशी 
   " तो दुर्ग असाध्य , सलाबत. मोर्चे चालवून सुरुंग लावावे तर रान रेतीचे , तोफा नीच धरल्या तर गोळा रेतीत जातो. चढवल्या तर कुंभेरीपार जातो. "  एके दिवशी खंडेराव होळकर भोजन आटोपून निशाण्याजवळ आले. तेवढ्यात एकाएकी किल्यातुन गोळी आली , ती खंडेरावांना लागली आणि खंडेराव खाली कोसळले.मल्हारावांस पुत्रशोक 
रघुनाथरावाच्या आदेशानव्ये मल्हारराव होळकराने आपला पुत्र खंडेराव यास चार हजार स्वारांसह नोव्हेंबर महिन्यात दिल्लीस पाठवले. तिथे त्याने दि. २१ नोव्हें. रोजी किशनदासच्या तळ्याजवळ आपला मुक्काम ठोकला.
खंडेरावाने आपला तळ पलवलच्या दक्षिणेस १७ मैलांवर होडाळ येथे ठेवून आसमंतातील बरसान, नंदगाव हि सुरजमलच्या ताब्यातील ठाणी जिंकून घेतली. दरम्यान स्वतः इमाद देखील या मोहिमेत सहभागी झाला असून त्याने घासेरा किल्ल्यावरील स्वारीत खंडोजीला मदतीसाठी बोलावले. या जोडगोळीने हा किल्ला अल्पवधीत जिंकून घेतला.

    दरम्यान रघुनाथराव आणि सुरजमल या दुसऱ्या आघाडीवर वेगळेच नाट्य सुरु झाले होते. रघुनाथराव नर्मदेच्या पुढे - मागे असतानाच सुरजमलने जयपूरच्या माधोसिंगासोबत संरक्षणाचा गुप्त करार केला होता. परंतु मराठी फौज राजपुतान्यात आल्यावर सुरजमलने आपला वकील रूपराम कोठारे यास दादासाहेबाकडे रवाना करत तहाची वाटाघाट आरंभली. त्यानुसार जाट मराठी सेनापतीस चार लाख रुपये तसेच बादशाहकडून जाटांच्या बंदोबस्ताकरता जितकी रक्कम बादशाही संरक्षण करारानुसार मिळणार होती, तितकी देण्याचे मान्य केले. परंतु सुरजमलसोबत समझोता न करता त्याच्याकडून कोट्यवधी द्रव्य उकळण्याची दादा आणि इमादची मसलत यापूर्वीच शिजल्याने जाटाच्या अटी अमान्य करण्यात आल्या व तह करायचाच असेल तर जाटाने आपणांस दोन कोट रुपये द्यावे अशी नवी मागणी पुढे करण्यात आली. अर्थात, जाटाकडून यास नकार मिळणे स्वाभाविक होते. पर्यायाने जाट आणि मराठी सरदारांचे युद्ध अटळ होते.       
मल्हाररावाचा मदतीस येण्याचा निरोप मिळाला त्यावेळी खंडेराव मेवात कडील प्रदेशातील जाटांची उठवण्याच्या कामात गर्क होता. बापाचा आदेश मिळताच मेवातमधून तो कुंभेरीस रवाना झाला. तिथे येऊन त्याने किल्ल्याच्या मोर्चेबंदीचे काम हाती घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली किल्ल्याच्या तटापर्यंत जाणारे भुयारासारखे वरून आच्छादलेले खंदक खोदण्यात आले. असेच एके दिवशी खंदकांची पाहणी करत असता किल्ल्यावरून झालेल्या तोफा - बंदुकांच्या मारगिरीत खंडेराव मानेस गोळी लागून ठार झाला. ( स. १७५४ मधील फाल्गुन वद्य एकादशी रोजी )
    त्यावेळी तीन विवाहित स्त्रिया, दोन कलावंतिणी, पाच रक्षा मिळून दहा स्त्रिया खंडेराव सोबत सती गेल्या. त्यासमयी अहिल्याबाई देखील सती जाणार होती परंतु मल्हाररावाने तिला सती जाण्यापासून रोखत पुत्रवत लेखले. 
खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांना पुत्र शोक आवरला नाही. 

" कुंभेरीची माती खणून यमुनेत टाकीन "  अशी शपथ त्यांनी घेतली. पुढे स्वतः पेशवे नानासाहेब यांनी मध्यस्ती करुन सुरजमल जाट व मल्हारबा यांच्यात मैत्री घडवून आणली.
इकडे कुंभेरीचा वेढा रेंगाळत चालला होता. अखेर उभयपक्षी बोलाचाली होऊन मे च्या मध्यावर पुढील अटींवर तह घडून आला :- (१) तीन वर्षांच्या हप्त्याने मराठ्यांना तीस लाख रुपये देणे. (२ ) जाट राजाने पेशकस म्हणून दोन कोट रुपये बादशाहस द्यावे अशी इमादने पुरी सुरजमलकडे मागणी केली होती. ते दोन कोट रुपये देण्याचे सुरजमलचा वकील रूपराम याने कबूल केले. परंतु यात आता बदल घडून हे दोन कोट रुपये बादशाह ऐवजी मराठे आणि इमाद यांना देण्यात यावे असे ठरले.
    तहाच्या अटी ठरल्यावर दि. १८ मे रोजी इमाद तर २२ मे रोजी रघुनाथाने कुंभेरीतून आपला तळ हलवत मथुरेस मुक्काम ठोकला.
 खंडेराव होळकरांच्या मृत्यूबाबत भाऊसाहेबांच्या बखरीत एक वाक्य आले आहे. बखरकार लिहितो 

" तो एके दिवशी राजश्री मल्हारराव होळकर यांचा पुत्र, खंडेराव होळकर, केवळ बेहोष होता ; त्याची आयुष्यमर्यादा सरली. म्हणोन त्यास मुंगीस पक्ष फुटतात तैसा प्रकार जाहला. भोजन करून मोर्चियांत निशाणापाशी आला. तो एकाएकीच प्रळय-वीज पडते तैसे होऊन, जेजालेची गोळी अकस्मात लागून मोर्च्यांत ठार जाहाला. शुभ्रवर्ण चक्षु होऊन गतप्राण जाहाला... . "

त्याउलट शिंद्यांच्याच छावणीतून दि. १८ एप्रिल १७५४ रोजी लिहिलेल्या पत्रात खंडेरावच्या मृत्यूबद्दल पुढील माहिती मिळते :- " फालगुण वद्य ११ येकादशीस राजश्री खंडेराव होलकर यास गोली मानेस लागोन मृत्यू पावले. .. " पत्रलेखक चिंतो कृष्ण वळे हा शिंद्यांचा आश्रित असून जयाजी, जनकोजी, दत्ताजी व महादजीचा लेखक म्हणून त्याने काम पाहिले आहे.
कुंभेचीच्या वेढ्यानंतर लगेचच नागौरचे प्रकरण घडले. आणि त्यात जयप्पा शिंदेंचा खून झाला. नंतर अब्दाली भारतात आला. मराठे त्याला मागे ढकलत ढकलत अटकेपार पोहोचले. तेथून पुढची चक्र फिरु लागली ती काय होती पाहूया पुढच्या भागात.. 

संदर्भ : - 
१) भाऊसाहेबांची बखर , प्रकरण पहिले. 
कुंभेरीचा वेढा.   शं.ना.जोशी. (१९५९ ) 
२) शिंदेशाही इतिहासाची साधने : - खंड तिसरा. 
३) कुंभेरीचा पेशवेकालीन इतिहास : - 
संजय क्षिरसागर 
४) कुंभेरी : - मराठी विश्वकोश

© निशांत कापसे. 


या ब्लॉगचा उद्देश फक्त संशोधनपुर्ण माहिती पोहोचवणे हा आहे. या ब्लॉग चे सर्व कॉपीराईट लेखकाकडे आहेत. लेखकाच्या परवानगी शिवाय शेअर करु नये. अन्यथा १९५६ च्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल... 

Comments

Popular Posts