मराठे - राजपूत संबंध
प्रारंभ ते १७६१ 
भाग - ०१ 

    मराठे व राजपूत यांचा संबंध तसा शिवकालापासुन आहे. म़ुघलांचा हुकमाचा एक्का व औरंगजेबाचा विश्वासू व पराक्रमी सरदार मिर्झाराजे जयसिंग जेव्हा महाराष्ट्रात ( स्वराज्यात ) आले तेव्हा पासून. इ.स. १६६५ साली जेव्हा पुरंदरचा तह झाला ज्यात शिवाजी महाराजांनी म़ुघलांना २१ किल्ले व ०४ लाख होन उत्प्नाचा प्रदेश देऊ केला. तेव्हापासूनच मराठे व राजपूत यांचा संबंध आहे. 
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा अहमदनगरजवळील भिंगार या गावी मृत्यू झाला. त्याचे प्रेत खुलताबाद येथे गुरुच्या कबरीजवळ दफन केले.  त्याच्या मृत्यूनंतर भोपाळ जवळ असलेला त्याचा तिसरा मुलगा मोहम्बद खान मुअज्जम हा तातडीने औरंगाबादला आला. त्याच ठिकाणी त्याने आपल्या बापाचे क्रियाकर्म केले व त्याच ठिकाणी त्याने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. औरंगजेबाने मरण्याच्या आधी अखंड हिंदुस्तानाचे ( मराठ्यांचे चिमुकले स्वराज्य सोडून ) तिन भाग केले होते. सर्वात पहिला उत्तर हिंदुस्तानाचा भाग मोठा मुलगा मोहम्मद  आझमशहा याला दिला. थोडक्यात औरंगजेबाने बादशहा आझमशहाला बनविले. दुसरा मध्य हिंदुस्तानाचा भाग लहान मुलगा मोहम्मद खान मुअज्जम याला दिला. आणि तिसरा व शेवटचा दक्षिण हिंदुस्थान अर्थात संपूर्ण दख्खन हा सर्वात लहान व लाडका व विश्वासू मुलगा मोहम्मद कामबक्ष याला दिला. १७०७ साली औरंगजेब मेला. त्यानंतर मुअज्जम याने कामबक्ष व आझम यांना ठार केले. सन १७०८ साली मुअज्जम ने राजपुत्र शाहु यांना कैदेतून मुक्त केले. 
    
     शाहु महाराष्ट्रात आले . त्यानंतर चा इतिहासाचे इथे काही काम नाही. फक्त एवढेच सांगतो १७०८ साली खेड या ठिकाणी ताराबाई व शाहु यांच्यात जोरदार लढाई झाली व त्यात शाहुं चा विजय झाला. सन १७१३ साली शाहुं नी बाळाजी विश्वनाथ भट या विश्वासु व कर्तबगार सरदाराला पेशवाई ची वस्त्रे दिली. एप्रिल १७२० साली बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यानंतर त्याचा जेष्ठ सुपुत्र थोरला बाजीराव याला पेशवा बनवले. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत राजपुतान्यांत वजन निर्माण करणे बाजीरावांशिवाय कोणालाच जमले नाही. १७४० नंतर जेव्हा नानासाहेब पेशवे बनले त्यानंतर १७४३ पासुन मराठे संपूर्ण राजपुतांना ताब्यात घेऊन दिल्लीचे राजकारणात खेळु लागले. उदयपूर , जयपूर , बुंदी - कोटा सारखी संस्थेने आपले अंतर्गत कलह सोडविण्यासाठी मराठ्यांची मदत घेऊ लागले. मराठे मागतील तेवढे द्रव्य राजपुताण्यातील सरदारांनी देऊ केले. १८ व्या शतकात प्रसिद्धीस आलेल्या हिंगणे घराण्याचे पूर्वज जयपूरच्या कछवाह घराण्याचे नाशिकचे तीर्थोपाध्ये बनले होते. म़ुघलांच्या दक्षिणेतील अनेक स्वाऱ्यांमुळे दक्षिणेत आलेले राजस्थानी सैनिक हे कार्य करीत होते. पण हे सर्व वैयक्तिक रित्या होत असे.  १७४३ साली जयपूर च्या सवाई जयसिंग चा मृत्यू झाला. जयसिंगाला दोन मुले होती. मोठा ईश्वरसिंग व लहान  माधोसिंग . जयसिंगाच्या मृत्यूने राजस्थानात कोणताही मोठा नेता उरला नाही.
     सवाई जयसिंग मेल्यावर धर्मशास्त्रानुसार ईश्वरसिंग गादीवर येणे योग्य होते. रीतसर तो गादीवर बसला. पण सवाई जयसिंगाने एक चुक केली होती. तीत या दोघांच्या तंट्याचे कारण होते. इतर संस्थानिकांप्रमाणेच जयसिंगाची एक फार मोठी महत्त्वकांक्षा होती की, आपले लग्न उदेपुर च्या शिसोदे घराण्यातील मुलीशी व्हावे . त्याचप्रमाणे दि ०६ जुन १७०८ या दिवशी महाराणा अमरसिंहाच्या मुलीचे म्हणजे महाराणा जगतसिंहाच्या बहिणीचे ( चंद्रकुवर बाईचे ) लग्न आंबेरचा महाराजा सवाई जयसिंग बरोबर झाले. त्यावेळेस एक करार झाला. त्यात पुढील अटी होत्या. १) चंद्रकुवर बाई जयसिंगाच्या सर्व राण्यांमध्ये थोरली समजली जावी. २) तीला मुलगा होईल तो जयसिंगाचा सर्वात थोरला मुलगा समजला जावा म्हणजेच त्यास जयपूर ची गादी मिळावी ३) तीला मुलगी झाल्यास तीचे लग्न मुसलमानाशी होऊ नये. या सर्वात जयसिंगाचे दुर्दैव असे की चंद्रकुवर बाईला पहिला मुलगी झाली व दुसरा मुलगा . वरील करारांप्रमाणे दुसरी अट योग्य नव्हती. 

     जयपुरच्या गादीवर वास्तविक हक्क ईश्वरसिंहाचा होता . हा पेच न मिटवताच जयसिंगाचा मृत्यू झाला. नंतर महाराणा जगतसिंह हा आपला आतेभाऊ माधोसिंह यास जयपूर ची गादी मिळावी या करीता ईश्वरसिंह यावर चालून गेला. दोघेही जामोली गावाजवळ ४० दिवस समोरासमोर लढाईच्या इराद्याने उभे होते. पण प्रत्यक्षात लढाई झाली नाही. ईश्वरसिंहाने माधोसिंहास २४ लाख रुपये देऊन राज्याचा निम्मा भाग देण्याचे मान्य केले. पण माधोसिंहाने ते अमान्य करुन त्याने ईश्वरसिंहा विरुद्ध उचल खाल्ली . शेवटी १७४५ च्या एप्रिलमध्ये ईश्वरसिंह व त्याच्या सहाह्यास आलेले मराठे यांनी महाराणाच्या सैन्यावर हल्ला करून त्यास उधळून लावले. पण आता ईश्वरसिंहाचे मन बदलून आता तो माधवसिंहास काहीच देण्यास तयार होईना. तेव्हा ०४ अॉक्टोबर १७४६ रोजी नाथद्वार येथे बुंदीचा पदच्चुत राजा उम्मेदसिंह हाडा , माधवसिंह व महाराणा यांनी एकत्र जमुन ईश्वरसिंहावर हल्ला केला , ०२ लाख रुपये देऊन मल्हारराव होळकरास मदतीसाठी बोलावले. जयाप्पा शिंदे व त्याचा सहकारी रामचंद्रबाबा यांना हे मान्य नव्हते. मल्हाररावाने एक हजाराची फौज घेऊन आपला खंडेराव यास तिघांची मदत करण्यास पाठवले. अनेक प्रकारच्या अटी ईश्वरसिंहावर युद्ध टाळण्यासाठी घातल्या. पण ईश्वरसिंह काहीच देण्यास तयार नव्हता. शेवटी ०१ मार्च १७४७ रोजी लढाई झाली. त्यात ईश्वरसिंहाचा विजय झाला. खंडेराव होळकर युद्धात सहभागी न होता लुट मिळवण्यासाठी गेला असा प्रवाद आहे. यानंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पेशवा बाळाजी बाजीराव स्वतः राजस्थानात नेवाई ला गेला. भांडत नीट समजून घेतले. त्याचा कल हा होळकर म्हणत होते त्याकडे होता. तरीही ईश्वरसिंह अनुकूल होणे आवश्यक होते. पण तो अनुकूल होईना. शेवटी प्रकरण निकारावर आले. त्याप्रमाणे जयपूर संस्थानातील बागरु गावाजवळ ३ अॉगस्ट ते ८ अॉगस्ट १७४८ असे ६ दिवस लढाई झाली. त्यात ईश्वरसिंहाचा पराभव झाला. तरीही तो एकही परगाणा देण्यास तयार होईना. तथापि आपले काही चालत नाही असे पाहुन ईश्वरसिंहाने १४ डिसेंबर १७५० रोजी विष पिऊन आत्महत्या केली. शेवटी जे व्हायचे तेच झाले. जे राज्य माधवसिंहास मिळायचे होते ते त्यालाच मिळाले. पण माधवसिंहात कृतज्ञतेचा अंश मुळीच नव्हता.

क्रमशः 

संदर्भ : - 
१ ) मराठ्यांचा इतिहास खंड ०१ आणि ०२ 
लेखक - अ.रा.कुलकर्णी , ग.ह. खरे
२ ) मराठी रियासत खंड ०३  गो.स.सरदेसाई 
३ )  पेशवे दफ्तर खंड २१, २७

#इतिहासाच्या_पाऊलखुणा 
#इतिहासाची_सुवर्णपाने 
#peshwai

Comments

Popular Posts