उत्तरहिंद मराठे

उत्तरहिंद मराठे

 भाग : - ०१ 

       १८ व्या शतकातील अफगाणिस्तान.   अरबी , दारी , पश्तो बोलणाऱ्या पठाणांचा , आणि टोळधाडी करणाऱ्या लुटारूंचा भरणा असलेला प्रदेश

नादिरशहाच्या नेतृत्वाखाली या पठाणांनी पुर्वेकडील सुबत्ता पहिल्यांदा पाहिली होती. वेळ मिळेल तेव्हा ती ओरबाडली होती.
पाच नद्यांच्या ईश्वरी आशिर्वादाने सधन झालेला पंजाब आणि त्याच्या शेजारी असलेल्या सरहिंदच्या प्रांताला जणू एखादा शाप मिळावा तशा या टोळ्या मनमुरादपणे येऊन लूट करू लागल्या. नादिरशहाच्या मृत्यूनंतर अब्दालीने सर्व पठाणांना एकत्र करून काबुल येथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. मुळात पंजाब व सरहिंदच्या प्रांतातले शिख हे कडवे शिपाई. तलवारीला देव माननारे. पण या रोजच्या जाचाला तेही कंटाळले होते. याचा काहीतरी बंदोबस्त करणे आवश्यक होते.

    
    अहत तंजावर ते तहत पेशावर. ही स्थिती खरोखर त्या काळत होती. १७५८ साली मराठे अटकेपार पोहोचले होते. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठी सीमा थेट अफगाणिस्तानाच्या सिमेपर्यंत जाऊन भिडल्या होत्या. " हर हर महादेव " चा जयघोष अफगाणिस्तानापर्यंत जाऊन भिडला. अफगाणिस्तान चा वृक्ष प्रदेश पाहून मराठी मनगटं शिवशिवली. त्यांच्या मनात तो प्रदेश जिंकण्याची उर्मी निर्माण झाली.  पण या सर्वांची सुरुवात खूप अधी झाली. 
शुक्रवार दि. २० फेब्रुवारी १७०७. अहमदनगरजवळील  भिंगार या गावी औरंगजेबचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत खुल्ताबाद जवळील गुरुच्या कबरीजवळ दफन करण्यात आले. परंपरेप्रमाणे त्याच्या मुलांमध्ये यादवी निर्माण झाली. या सर्वात मुहम्मद मुअज्जम याची सरशी झाली. त्याने त्याचे दोन भाऊ आझमशहा आणि कामबक्ष यांना ठार करून दिल्लीच्या गादीवर बसला आणि त्याने स्वतःला बाहादुरशहा असा किताब धारण केला. मराठ्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण व्हावे म्हणून त्याने छत्रपती संभाजी महाराज पुत्र शाहू यांना कैदेतून मुक्त केले. शाहूंनी महाराष्ट्रात येण्याआधी महाराणी ताराबाईंना पत्र लिहिले की " आम्ही येत आहोत ".     येथून ताराराणींनी पुढचे राजकारण खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी शाहूंना तोतया ठरविले. इ.स. १७०८ साली खेड या गावी शाहू व ताराबाईंच्या पक्षात तुंबळ लढाई झाली ज्यात शाहूंचा विजय झाला. शाहूंनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. याच सुमारास दिल्ली दरबारात एक राजकारण कलाटणी घेत होते.सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसैन अली या दोघा सय्यद बंधुंचा प्रभाव दिल्ली दरबारात वाढू लागला , बादशहा फक्त नामधारी प्रमुख राहिला. इकडे दक्षिणेत शाहू आपले राज्य स्थिर करत असतानाच एक वाईट घटना घडली.  मराठ्यांचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे निधन झाले. पुढचे सेनापती पद  त्यांचेच पुत्र चंद्रसेन जाधवराव यांना मिळाले. शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ यांची हुशारी जाणून होते. त्यांच्या याच हुशारी आणि मुसद्दीपणामुळे त्यांना शाहूंनी ' सेनाकर्ते ' हा किताब देऊ केला. 
१७१२ साली मुअज्जम चा मृत्यू झाला. जहांदर शहा पुढचा बादशहा बनला पण फक्त नावाला. याच काळात या राजकारणात एका कलीचा प्रवेश होत होता , चिन किलीच खान उर्फ निजाम - उल - मुल्क. 
१७१३ साली बाळाजी विश्वनाथांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे देऊ केली. शाहूंचे आधीचे पेशवे होते बहिरो पंत. पण कान्होजी आंग्रे यांनी आपला नुर पालटला.  त्यांनी ताराबाईंचा पक्ष स्वीकारला. त्यांना शाहूंच्या पक्षात आणण्यासाठी बहिरो पंत गेले होते पण कान्होजींनी त्यांनाच कैद केले. त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे केले. १७१८ साली जहांदर शहा मेला आणि फार्रखसियार नवा बादशहा बनला. सन १७१९ साली बाळाजी पंत दिल्लीला गेले. या मोहिमेत बाळाजी विश्वनाथांनी मराठ्यांच्या स्वराज्याला बादशहाची मान्यता मिळवली  , शिवाय दक्षिणेतील सहा सुभ्यातून सनदा मिळवण्याची परवानगी बादशहाकडून मिळवली. दि. ०२ एप्रिल १७२० या दिवशी सासवड येथे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. दि. १७ एप्रिल १७२० या दिवशी महसुर्ला या गावी शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे दिली. 
ऑक्टोबर १७२४ साली साखरखेडा येथे एक लढाई झाली. ज्या लढाईत निजामाने बाजीरावांना  शहामतपनाह असे म्हटले. बाजीरावांची किर्ती सर्वदूर पसरली ती पालखेड पासून. इतिहास एका प्रतापसुर्याची वाट पाहत होता , आणि निजाम आपला लाजीरवाणा पराभव स्वीकारण्यासाठी पुण्याच्या दिशेने पाऊल टाकत होता 
   १७२८ साली पालखेडचे युद्ध झाले. पण त्या आधी घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा घेऊ. 
१७०८ साली सातारा येथे शाहूंनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. १४ जून ला शाहूंनी पन्हाळगड काबीज केला आणि दि. २७ जून ला वडगाव येथे सेनापती धनाजी जाधवराव मृत्यू पावले. या वेळेस ताराबाई खेळणा म्हणजे विशाळगडावर होत्या. त्यांनी तातडीने रामचंद्रपंत आमात्य व पिराजी घोरपडे यांना विशालगडावर बोलावले. आणि पुढे काय करायचे या विषयी चर्चा झाली. १७१० साली ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी तिसरा याच्या नावाने कोल्हापूर गादीची स्थापना केली. 
दि. ६ मार्च १७२८ या दिवशी निजामाने १७ कलमी तहावर मुंगी - शेगाव येथे स्वाक्षरी केली. 
याच वर्षी म्हणजे १७२८ सालच्या उत्तरार्धात चिमाजी आप्पांनी आमझेरा येथे गिरिधरबहाद्दराचा पराभव केला. नंतर बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत लक्ष द्यायला सुरुवात केली. बाजीरावांनी माळव्यात आपले रोवायला सुरुवात केली आणि बुंदेलखंडात मुहम्मद बंगशचा पराभव केला. 
या सर्व घटना होत असतानाच करवीर राज्यात तख्त पलटाचे राजकारण सुरू होते. शिवाजी महाराज तिसरे आणि ताराबाई यांना कैद केले गेले. आणि राजाराम महाराज यांची तिसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचा मुलगा संभाजी तिसरा हे  गादीवर बसले. दि. १३ एप्रिल १७३१ या दिवशी करवीर व सातारा दोन्ही राज्यात समेट झाला. दोन्ही राज्यात ९ कलमी करार झाला. हा वारणेचा तह या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. दि. १४ फेब्रुवारी १७३५ रोजी मातोश्री राधाबाईंची काशीयात्रा सुरु झाली. राधाबाई ६ मे रोजी उदयपूर ला आल्या , उदयपूरचे राणा जगतसिंग यांनी राधाबाईंचा यथोचित सत्कार केला. नंतर राधाबाई दि. २१ जून रोजी जयपूरात आल्या. 
यानंतर राधाबाई दि. १७ ऑक्टोबर १७३५ रोजी (काशी )  वाराणसीत येऊन पोहोचल्या. काशी हे क्षेत्र बंगशाचे. त्याला ही बातमी समजली आणि लगेचच त्याने आपला दिवाण हरिप्रसाद याला राधाबाईंच्या स्वागतासाठी पाठवले. मे १७३६ रोजी राधाबाई आपली काशीयात्रा संपवून पुण्यात दाखल झाल्या. त्या आधी म्हणजे दि. १९ फेब्रुवारी १७३६ या दिवशी चिमाजी आप्पांचे चिरंजीव सदाशिवपंत उर्फ भाऊसाहेबांची मुंज करण्यात आली. १७३७ साली बाजीरावांनी थेट दिल्लीवर धडक मारली.
१७४० मध्ये बाजीराव व चिमाजी अप्पा दोघांचेही निधन झाले. पुढे बाजीरावांचेच पुत्र नानासाहेबांना शाहू पेशवाईची वस्त्रे दिली. १७४२ साली विश्वासरावांचा जन्म झाला. आणि १७४३ साली अमेर चे महाराज सवाई जयसिंग यांचे निधन झाले. १७४३ ते १७५० या काळात सवाई जयसिंग यांचे दोन मुले ईश्वरसिंह व माधवसिंह यांच्यात यादवी सुरू होती. १७५०  साली ईश्वरसिंहाने स्वतःला साप डसवून आत्महत्या केली. याच्या ३ वर्ष आगोदर म्हणजे १७४७ साली इराणच्या नादिरशहाचा मृत्यू झाला. अब्दालीने सर्व पठाणांना एकत्र करून स्वतःला काबुल येथे राज्याभिषेक करवुन घेतला. 
१७५२ साली पेशव्यांतर्फे शिंदे व होळकर , तर बादशहा तर्फे त्याचा वजीर सर्फदजंग यांच्यात एक तह / करार झाला. हा तह अहमदनामा किंवा अहमदीया करार या नावाने ओळखला जातो.  
या करारानुसार पेशव्यांना तुर्की बादशहाकडून अजमेर व आग्रा या दोन सुभ्यांची सुभेदारी मिळणार होती. तर याच्या बदल्यात मराठ्यांना बादशहीचे परकीय आक्रमणांपासुन रक्षण करायचे होते. म्हणून मराठ्यांची काही फौज कायम दिल्लीत राहिल असे ठरले. त्यानुसार दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती म्हणून अंताजी मानकेश्वरांना नियुक्त केले गेले. १७५३ ते १७५५ या काळात रघुनाथरावांच्या दोन स्वाऱ्या उत्तरेत झाल्या. कुंभेरी येथे मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव तोफेचा गोळा लागुन मारले गेले. " कुंभेरीची माती खणून यमुनेत टाकतो " अशी शपथ मल्हारबांनी घेतली. शेवटी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन स्वतः नानासाहेबांनी हस्तक्षेप केला. आणि मल्हारबा व सुरजमल जाट यांच्यात मैत्री घडवून आणली. 

याच काळात लाहोर - पंजाब भागात एक राजकारण कलाटणी घेत होते.
 दि. ०३ नोव्हेंबर १७५३ रोजी लाहोर - पंजाबचा सुभेदार मीर मन्नु याचा मृत्यू झाला. मीर मन्नु हा एक हुशार सरदार होता. त्याला मुश्नुल्मुक उमराव अशी पदवी होती. अठराव्या शतकातील शिरस्त्यानुसार बापाच्या नंतर मुलाला सुभेदारी देणे , मग लायक असो वा नसो  ही एक वाईट पद्धत होती. मीर मन्नु च्या मृत्यूवेळी त्याची बायको मुघलानी बेगम प्रसूती होऊन तीला मुलगा झाला. आता पंजाबात राज्य करायचे म्हणजे त्याला दिल्ली आणि अब्दाली दोघांचीही मान्यता असणे आवश्यक होते. या मिर मन्नु व मुघलानी बेगम यांना आधी एक मुलगी होती. तीचे नाव उमदाबेगम. ही उमदाबेगमेचे लग्न  दिल्लीचा नवनियुक्त वझीर  इमाद - उल्ल मुल्क गाझीउद्दीन फिरोझजंग ( तिसरा ) याच्याशी झाले होते. मुघलानी बेगमेचे नशिब खराब की तिचा मुलगा अल्पायुषी ठरला. आणि लहाणपणीच वारला. अब्दालीने आता पंजाब हस्तगत केले , आणि मुघलानी बेगमेला झिडकारून लावले. मुघलानी बेगमेने आपले गाऱ्हाणे दिल्लीला कळवले. ही महाकारस्थानी बाई होती. 
आपल्या सैन्यासह वजीर दि. ०७ फेब्रुवारी १७५६ रोजी सरहिंद येथे पोहोचला.  आपल्या जावयाला मुघलानी बेगम पुरेसे ओळखत नव्हती.  त्याने तिथला प्रांतिक अमलदार आदिनाबेग याच्या साहाय्याने त्याची बायको व मुघलानी बेगम दोघांनाही कैद करून दिल्लीला रवाना केले. आणि पंजाबचा ताबा घेतला. 
मुघलानी बेगम दिल्लीला पोहोचताच तीला आपल्या जावयाचे गुण समजले. वजीर बनताच इमादने शाही खजिण्याचा ताबा घेतला. , मलीका - ए - जमानी तसेच शाही जनाण्यातील इतर स्त्रीयांचे खर्च थोपवून धरले. मुघलानी बेगमेला माहिती होते , की वजीराला रोखण्याची ताकद एकाच इसमात  आहे , आणि तो म्हणजे अहमदशहा अब्दाली.  
वास्तविक पहाता तीला आधी अहमदशहाने पंजाबातून झिडकारून लावले होते. तीला अहमद शहाच्या ताकदीचा अंदाज होता. अहमदशहापर्यंत पोहोचण्यासाठी तीला आणखी एक मोहरा हवा होता. आणि तो तिने शोधला.   नजीबखान रोहिला 
नजीब खान रोहिला हा मराठ्यांच्या इतिहासातील कली होता. राघोबादादा उत्तरेत असताना नानासाहेबांनी या खेळीयाला संपवा , म्हणून हुकुम दिला होता. परंतु नजीबाला आपला धर्मपुत्र मानणाऱ्या होळकरांनी मध्यस्थी करून नजीबाला वाचवले होते व तेव्हा तुर्त आपले अंग सावरुन तो गंगेपलिकडे गेला. मराठ्यांबद्दलचा राग त्याच्या मनी होताच. तो संधीची वाटच पहात होता. राघोबादादा परत जाताच नजीब खान पुन्हा दिल्लीस गेला आणि मुघलानी बेगमेला हाताशी धरून मलिकेशी भेटून त्याने तिला समजावले की , आता मराठ्यांशी संगत करता बादशाही नष्ट होणार हे निश्चित. मलिकेने नजीबाच्या बोलण्यात येऊन वजीराची सत्ता नाहीशी केल्यास तुलाच वजीर करु , असे नजीबाला वचन दिले. 
आणि... आणि कालचक्रच जणू फिरले ! 

क्रमशः 

संदर्भ लेखन : -
०१) The Era of Bajirao - Uday Kulkarni 
०२) पेशवे दफ्तर ( संकलीत कागदपत्रे ) 
खंड -१ , २, २१, २७ 
०३) पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे 
०४) इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग - ०१ 
०५) मराठी रियासत - गो.स. सरदेसाई 
०६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड - ०१ 
०७) भाऊसाहेबांची बखर - श.ना. जोशी 
०८) पेशव्यांची बखर 
०९) पानिपताची बखर 
१० ) पुरंदरे दफ्तर - खंड - ०१ 


छायाचित्र क्र. ०१. 
१७५८ अफगाणी टोळ्यांनी  साली दिल्लीवर स्वारी  ज्या कत्तली केल्या व खणत्या लावल्या. 
छायाचित्रे क्र. ०२ 
१८ व्या शतकातील अफगाणिस्तान. 

Comments

Popular Posts